प्रकरण १६

दस्तऐवजीकरण व मदत मिळवणे

ह्या प्रकरणात लाटेक् आज्ञांचे दस्तऐवजीकरण कसे वाचावे व अडचणी आल्यास मदत कशी मिळवावी हे पाहूया.

आज्ञासंचांच्या हस्तपुस्तिका मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

texdoc

जर तुम्ही संगणकावर टेक्-वितरण बसवले असेल व बसवताना दस्तऐवजीकरणाचा समावेश केला असेल, तर तुमच्या संगणकावरील हस्तपुस्तिका texdoc ह्या आज्ञेतर्फे मिळवता येऊ शकतात. त्याकरिता आज्ञापटलावर पुढीलप्रकारे आज्ञा टाकता येऊ शकते.

texdoc < आज्ञासंचाचे नाव >

`<` व `>` ही चिन्हे आज्ञेचा भाग नाहीत.

ह्या आज्ञेसह तुम्ही सांगितलेल्या नावाच्या आज्ञासंचाची हस्तपुस्तिका उघडली जाईल. ह्या साधनातर्फे तुम्ही जे नाव प्रविष्ट केले आहे त्याच्याशी सर्वात जास्त निगडित असणाऱ्या आज्ञासंचाची धारिका उघडली जाईल. जर तुम्हाला निगडित आज्ञासंचांच्या नावाची यादी पाहायची असेल, तर तुम्ही पुढील आज्ञा टाकू शकता.

texdoc -l < आज्ञासंचाचे नाव >

texdoc.org

हे एक संकेतस्थळ आहे. ह्यावर texdoc ह्या आज्ञापटलावरील साधनाप्रमाणेच सर्व हस्तपुस्तिका एकत्रित करून ठेवल्या आहेत. तुम्ही आज्ञासंचाचे नाव शोधू शकता व त्यानंतर निगडित आज्ञासंचांची यादी दिसते व त्यातील कोणतीही हस्तपुस्तिका तुम्ही वाचू शकता.

CTAN

हे संकेतस्थळ कॉम्प्रेहेन्सिव्ह टेक् अर्काईव्ह नेटवर्क ह्या पूर्ण नावाचा संक्षेप आहे. बहुतांश लाटेक् आज्ञासंच ह्या संकेतस्थळावरच प्रकाशित होतात. तुम्ही हे संकेतस्थळ चाळून पाहू शकता व त्यावरही प्रत्येक आज्ञासंचाची हस्तपुस्तिका उपलब्ध आहे. ctan.org/pkg/<pkg-name> ह्या पत्त्यावर बहुतांश वेळा प्रत्येक आज्ञासंचाचे मुखपृष्ठ आढळते. त्यावर आज्ञासंचाच्या माहितीची धारिका व हस्तपुस्तिका सापडते.

लाटेक्-वरील पुस्तके

लाटेक्-वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्या पुस्तकांमध्येे नवशिक्यांसाठी ह्या संकेतस्थळाहून आणखी तपशिलांत लहानसहान बारकाव्यांची माहिती तुम्हाला सापडू शकते. ह्या यादीतील पुस्तके तुम्ही चाळू शकता.

लाटेक् प्रकल्पाच्या संकेतस्थळावर पुस्तकांची एक यादी उपलब्ध आहे. त्यातील बहुतांश पुस्तके प्रकल्पसदस्यांनीच लिहिलेली आहेत. ह्यातील सर्वात महत्त्वाची पुस्तके म्हणजे स्वतः लॅम्पर्ट ह्यांनी लिहिलेली लाटेक्-हस्तपुस्तिकाThe LaTeX Companion हे पुस्तक.

ह्यांव्यतिरिक्त इतर पुस्तके -

मदत मिळवणे

लाटेक्-विषयक प्रश्नोत्तरांसाठी अनेक संकेतस्थळे आहेत. कदाचित त्यांतील सर्वात प्रसिद्ध असणारे एक म्हणजे टेक् - लाटेक् स्टॅकएक्स्चेन्ज. मराठीतून लाटेक्-विषयक प्रश्नोत्तरांसाठी तयार केलेले टॉपआन्सर्स टेक्-मराठी हे संकेतस्थळ व त्याच संकेतस्थळावर इंग्रजीतून टेक्-विषयक प्रश्नांसाठी असलेले टॉपआन्सर्स टेक् ही सर्व संकेतस्थळे टेक्-वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आहेत. ह्याप्रकारच्या संकेतस्थळांवर प्रश्न विचारताना तुम्हाला लघुतम कार्यकारी उदाहरण (लकाउ) अर्थात तुम्ही केलेला प्रयत्न दाखवणारे व तुम्हाला असलेल्या शंकेइतकीच आज्ञावली असणारे उदाहरण सादर करणे आवश्यक असते.

लघुतम कार्यकारी उदाहरण (लकाउ) कसे तयार करावे?

लकाउ तयार करण्यासाठी सुरुवात करताना -

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Text
\end{document}

एवढ्या मुख्य ओळी आधी लिहाव्यात. जोवर तुम्हाला येत असलेली अडचण अथवा शंका दिसू लागत नाही हळू हळू एकेका ओळीची भर घालावी. तुमच्या मूळ आज्ञावलीतील एक एक ओळ कापत अडचणीपर्यंत पोहोचणे हा दुसरा मार्ग असू शकतो, परंतु हे अधिक वेळखाऊ असू शकते.

जर तुम्हाला लकाउमध्ये थोडा मजकूर भरणे आवश्यक वाटत असेल, तर lipsumसारखे आज्ञासंच उपयुक्त ठरू शकतात. त्यांसह नमुना मजकूर लिहिता येऊ शकतो. marathi आज्ञासंचासह मराठीतून नमुना मजकूर लिहिण्याची सोयही उपलब्ध आहे.

अहवाल

मदत मागताना एका गोष्टीची मागणी होऊ शकते, ती म्हणजे तुमच्या लाटेक्-चालनाचा अहवाल. हा .log नावाच्या धारिकेत लिहिला केला जातो. ह्यात लाटेक्-चालनात काय काय घडले, कोणते आज्ञासंच वापरले गेले, त्यांच्या कोणत्या आवृत्त्या वापरल्या गेल्या, हे कोणते टेक्-वितरण वापरले जात आहे, त्याची कोणती आवृत्ती वापरली जात आहे, वापरल्या जाणाऱ्या धारिका कुठल्या पत्त्यावर आहेत, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आढळतात.

अहवालाची धारिका शोधण्याकरिता तुम्हाला धारिकांचे प्रत्यय दाखवणे सुरू करावे लागू शकते. हे कार्यप्रणालीवर अवलंबून आहे. लिनक्स प्रणालीवर बहुतांश वेळा प्रत्यय दाखवणे सुरूच असते.

अहवालाच्या धारिकेत कायमच तुम्हाला अडचणीचा संपूर्ण मजकूर पाहता येऊ शकतो. लाटेक्-मधील अडचणींचे निरोप बहुतांश वेळा अर्थपूर्ण असतात, परंतु ते इतर मजकूर-संपादकांप्रमाणे असतीलच असे नाही.

अनेक संपादकांकडून अडचणीचा संपूर्ण मजकूर दाखवणे टाळले जाते. हे धोकादायक आहे. त्यामुळे महत्त्वाचे तपशील सुटू शकतात.

पुढील अभ्यास

अखेरीस आम्ही लाटेक्-आज्ञावल्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. त्यात लाटेक्-चा निरनिराळ्या क्षेत्रांतील वापर दिसतो. त्या सर्व उदाहरणांचा प्रत्यक्ष अभ्यासक्रमात समावेश करणे शक्य नसल्यामुळे हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. त्यातील आज्ञासंचांच्या हस्तपुस्तिकांमधून अधिक माहिती मिळवता येईल.