प्रकरण ६

लाटेक्-चा विस्तारित वापर

ह्या प्रकरणात लाटेक्-सह नव्या आज्ञा कशा रचाव्यात व विस्तारित वापरासाठी विविध आज्ञासंचांचा वापर कसा करावा हे आपण पाहणार आहोत.

लाटेक्-वर्ग निवडल्यानंतर विशिष्ट कार्य साधण्यासाठी एका अथवा अनेक आज्ञासंचांचा वापर केला जाऊ शकतो. ह्या आज्ञासंचांमार्फत -

लाटेक् अक्षरजुळणीची पद्धत बदलणे

मूळ लाटेक् आज्ञावली मर्यादित आहे व म्हणूनच निरनिराळे आज्ञासंच त्या आज्ञावलीत भर घालण्यासाठी व अधिकची कामे साधण्यासाठी वापरले जातात. भाषाविशिष्ट अक्षरजुळणी करणे (संयोगचिन्हांची मांडणी, विरामचिन्हे, स्थानिकीकरण इ.). निरनिराळ्या भाषांचे निरनिराळे नियम असतात. त्यामुळे लाटेक्-ला कोणत्या नियमांची निवड करावी हे सांगणे आवश्यक असते. बेबल ह्या आज्ञासंचातर्फे अशा भाषाविशिष्ट नियमांची जोडणी देता येते. उदाहरणार्थ -

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

%\usepackage[french]{babel}

\usepackage[width = 6cm]{geometry} % To force hyphenation here

\begin{document}

This is a lot of filler which is going to demonstrate how LaTeX hyphenates
material, and which will be able to give us at least one hyphenation point.
This is a lot of filler which is going to demonstrate how LaTeX hyphenates
material, and which will be able to give us at least one hyphenation point.

\end{document}

ह्या आज्ञावलीतील चौथी ओळ टिप्पणी म्हणून न लिहिता आज्ञावली म्हणून लिहा. त्यामुळे तिचा परिणाम पाहता येईल व मूळ फलितात ह्या आज्ञासंचाच्या वापरामुळे पडणारा फरक पाहता येईल. संयोगचिन्हांच्या मांडणीचे लाटेक्-मधील मांडणीचे मूलभूत नियम अमेरिकी इंग्रजीचे आहेत. मराठीच्या संयोगचिन्हांच्या मांडणीचे नियम अजून बेबल आज्ञासंचाचा भाग नाहीत.1 वापरकर्त्यांनी ह्या नियमांची यावच्छक्य भर घालण्याची नितांत आवश्यकता आहे.

बेबल आज्ञासंच आणखी अनेक सुविधा पुरवतो. भाषाविशिष्ट अक्षरजुळणीकरिता आम्ही प्रकरण ०६मध्ये काही तपशील पुरवले आहेत. कृपया ते पाहा.

दृश्यरूप बदलणे

दृश्यरूपात काही बदल करता येणे उपयुक्त असते. समासांची मापे बदलणे हा एक प्रामुख्याने लागणारा बदल असू शकतो. वरील उदाहरणात आपण जॉमेट्री नावाचा आज्ञासंच वापरलाच आहे. आता विशेषतः समास बदलण्याचे उदाहरण आपण पाहू.

\documentclass{book}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage[margin=1in]{geometry}

\begin{document}
Hey world!

This is a first document.


% ================
\chapter{Chapter One}
Introduction to the first chapter.


\section{Title of the first section}
Text of material in the first section

Second paragraph.

\subsection{Subsection of the first section}

Text of material in the subsection.


% ================
\section{Second section}

Text of the second section.

\end{document}

जॉमेट्री आज्ञासंच वापरून व न वापरून आपल्याला फलितात होणारा फरक पाहता येेईल.

कार्यक्षमता विस्तारणे

लाटेक्-चे एक बलस्थान हे की विविध कार्यांकरिता उपलब्ध असणाऱ्या हजारो आज्ञासंचांपैकी कोणताही लाटेक्-धारिकांमध्ये वापरता येतो. उदा. गणिती मजकूर लिहिणे, दस्तऐवजांतर्गत संदर्भ देणे, रंग वापरणे ह्या सर्व सोयींकरिता विविध आज्ञासंच आहेत. पुढील प्रकरणांमध्ये आपण काही आज्ञासंच पाहू.

नवीन आज्ञा घडवणे

काही वेळा एखाद्या दस्तऐवजात नवीन आज्ञा घडवणे आवश्यक असू शकते. अशी आज्ञा जी लाटेक्-सह अथवा आज्ञासंचांसह पुरवलीच गेली नाही आहे अथवा अशी आज्ञा जी वारंवार वापरावी लागत आहे.

पुढील उदाहरणात विशिष्ट प्रकारची दृश्यमांडणी मिळवण्याकरिता घडवलेली नवी आज्ञा पाहता येऊ शकते.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\newcommand\kw[1]{\textbf{\itshape #1}}

\begin{document}

Something about \kw{apples} and \kw{oranges}.

\end{document}

नव्या आज्ञेच्या व्याख्येत [1] अशा प्रकारे चौकटी कंसात लिहिलेली संख्या कार्यघटकांची एकूण संख्या दर्शवते. (इथे एक) तसेच #1 ह्या प्रकारे संख्या जिथे लिहिली जाते तिथे कार्यघटक म्हणून लिहिला गेलेला पाठ (पाठ्य मजकूर अथवा आज्ञा) जसाच्या तसा पुरवला जातो. वरील उदाहरणात नव्याने रचलेली \kw ही आज्ञा दोनदा वापरली गेली आहे. अनुक्रमे applesoranges असे दोन कार्यघटक त्या आज्ञेस आपण दिले. आपल्या व्याख्येमुळे हे दोन्ही कार्यघटक अनुक्रमे \textbf{\itshape apples}\textbf{\itshape oranges} म्हणून #1च्या जागी पुरवले गेले. लाटेक्-मध्ये कमाल ९ कार्यघटक असलेल्या आज्ञा घडवता येतात.

\textbf ह्या आज्ञेसह कार्यघटकास ठळक केले जाते. \itshape आज्ञेतर्फे इटालीय अक्षरे छापली जातात.

नव्या व्याख्या घडवणे केवळ कमी टंकलेखन करण्याकरिता उपयुक्त नसते. त्यामुळे अक्षरजुळणीविषयक गोष्टी मूळ आज्ञेपासून सुट्या होतात. संपूर्ण दस्तऐवज लिहून झाल्यावर समजा आपल्या आज्ञेचे फलित बदलावेसे वाटले, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन ते बदल करण्यापेक्षा केवळ आज्ञेच्या व्याख्येत बदल केला की दस्तऐवजात सर्व ठिकाणी तो लागू होतो. आता आपण xcolor आज्ञासंचासह \kw आज्ञेचे फलित ठळक करण्याऐवजी रंगीत करूया.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\usepackage{xcolor}

\newcommand\kw[1]{\textcolor{blue}{\itshape #1}}

\begin{document}

Something about \kw{apples} and \kw{oranges}.

\end{document}

अनेक नव्या आज्ञा घडवल्यामुळे अथवा भरपूर कार्यघटक असणाऱ्या आज्ञा घडवल्यामुळे बीजधारिका किचकट होऊ शकते, त्यामुळे नव्या आज्ञा घडवण्याची क्षमता सावधगिरीने वापरायला हवी.

स्वाध्याय

काही युरोपीय भाषांसह बेबल आज्ञासंच वापरून पाहा.2 ह्या भाषांचा मजकूर महाजालावरून सहज मिळवता येईल. संयोगचिन्हाच्या मांडणीत काय फरक पडतो त्याकडे विशेषत्वाने लक्ष द्या.

समासांची रुंदी जॉमेट्री आज्ञासंचासह बदलून पाहा. डावीकडचा समास, उजवीकडचा समास, खालचा समास व वरचा समास स्वतंत्रपणे बदलता येतो. त्याकरिता स्वल्पविरामांनी प्रत्येक प्राचले वेगळी लिहावीत.

lipsum हा आज्ञासंच वापरून, डॉक्युमेन्ट ह्या क्षेत्रात \lipsum ही आज्ञा वापरा. ही आज्ञा उदाहरणे तयार करण्याकरिता अतिशय उपयुक्त आहे. कारणाबाबत विचार करा.

\kw ह्या आपल्या नव्याने तयार केलेल्या आज्ञेचे दृश्यरूप आणखी बदलण्याचा प्रयत्न करा.


  1. रोजी पाहिले: १० फेब्रुवारी, २०२१ 

  2. बेबल आज्ञासंचासह युरोपीय भाषांमध्ये भरपूर कामे आजवर झाली आहेत. युरोपाबाहेरील भाषांवर अजून बरीच कामे होणे शिल्लक आहे. त्यामुळे बेबलच्या क्षमता पाहण्याकरिता युरोपीय भाषांसह तो वापरून पाहावा असे सुचवले गेले आहे.